मुळात भीमाकोरेगाव शौर्यदिवस(1 जानेवारी) आणि भीमा कोरेगावची दंगल(घडवून) यांचे संबंध जोडले जाऊन दलित अस्मिता नष्ट करणे; आणि दलित समाज पुन्हा तळागाळात धकलल्या जाऊन त्याने वर्णव्यवस्थेला उभे राहण्यासाठी हातभार लावावे अश्या प्रकारच्या षडयंत्रातुन भीमा कोरेगावची दंगल घडवली गेली होती. जर हिंदू संघटनेला उजवे आणि दलित संघटनेला डावे (जसे ते म्हाणतात) म्हाणले गेले तर यात फक्त एकाच गटाला टार्गेट करून दुसऱ्या गटाला मात्र क्लीनचिट दिली गेली.
समजा दंगल झालीचं, तर ती स्वतःच्या गटातील लोक स्वतःच्या गटाला इजा करतील का?, दंगलीचे कारण काय?, फक्त त्यात वर सांगितल्या प्रमाणे डावेच दोषी कश्या वरून ठरवले गेले?, दंगल व्हायच्या आधीच दंगल करणारे कसे ठरवले गेले?(फोन टॅपिंग करून वॉच ठेवणे), दंगल होण्यासाठी दोन गट हवे असतात मग उजव्या गटाला क्लीन चिट कशी?. मुळात या सर्व प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाहीत कारण हे सर्व ठरवून केले गेलेले होते.
उद्या 1 जानेवारीला गौरवशाली कोरेगाव भीमाच्या लढाईला 205 वर्ष पूर्ण होतील, त्याआधीच करणीसेनेच्या प्रमुखांनी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे कि भीमा कोरेगावच्या लढाईच्या विजयाचे स्मारक असलेले विजयस्तंभ पाडून टाकावे. अश्या प्रकारचे पत्र त्यांनी महाराष्ट्र सरकारला लिहले आहे. सध्याच्या घडीला इतिहासाचे मुद्दे प्रतिभूत करण्यासाठी इतिहासकारांची आणि संशोधकाची गरज नाही, गरज आहे ती फक्त एका विशिष्ट गर्दीची.
त्याचे सर्वोत्तम उदाहरणं म्हणजे पद्मावती ते पद्मावत प्रवास केल्यानंतर करनी सेनेने भीमा कोरेगावला टार्गेट करणे. चार वर्षाआधी एल्गार परिषदेचे संबंध भीमा कोरेगावशी जोडून असाच उन्माद घडवला गेला, ज्याचे अंतिम लक्षच विजय स्तंभाची ख्याती कमी करून त्याला बदनाम करणे होते.
1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावच्या युद्ध्यात ब्रिटिशांच्या एका छोट्याश्या तुकडीने, जिचे नाव महार बटालियन होते; पेशव्यांच्या एका मोठया सैन्यास हरवले. या लढाईतील ब्रिटिशाकडून लढणारे कित्येक सैनिक हे महाराष्ट्रातील दलित - महार सामुदायातील होते. महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात सुध्दा दलित - महार लोक मराठ्यांच्या सैन्यात होतेच, परंतु ही परंपरा पेशव्यांच्या काळात कायम राहिली नाही आणि बाजीराव दोनने आपल्या ब्राम्हणवादी संकीर्तनतेमुळे या लोकांना सैन्यात भरती करून घेण्यास नकार दिला. या लढाईला महत्व यासाठी आले कि, दलित महारांनी पेशवाई राज्याचा शेवट केला होता, जी पूर्णपणे ब्राम्हणवादी होती जी शूद्र लोकांना कसल्याही प्रकाराने माणूस समजत नव्हती.
महाराष्ट्राच्या उच्चवर्णीय सांस्कृतिक चेतनेमध्ये मराठा आणि पेशव्यांच्या नायकांना, ज्याप्रकारे लक्षात ठेवले जाते, त्याप्रकारे महाराष्ट्रातील इतर नायकांना लक्षात ठेवले जातं नाही. समाजसुधारनेचे अग्रनी ज्योतीराव फुले यांनी पाहल्यांदा महार लोकात जातीविषय अस्मिता निर्माण केली आणि हेच काम पुढे बाबासाहेबानी कायम ठेवले. या दोन लोकांच्या नेतृत्वात सगळ्यात मोठी कोणती अडचण समोर आली असेल तर ब्राम्हणवादी सामाजिक संरचनेच्या विरुद्ध लढत असतांना आपला आत्मसन्मान परत मिळवणे, जे कि फार अवघड होते.
या सर्व गोष्टीत भीमा कोरेगावची लढाई, दलित अस्मिता जागृत करण्यासाठी, एक सर्वोत्तम प्रतीक म्हणून पुढे आली. या लढाईला बाबासाहेबांनी ब्रिटिशाऐवजी महारांनी ब्राम्हणवादी पेशवाई गाडून टाकली असे प्रतिपादन केले. दलित नायकांमध्ये ज्योतीरावांपासून बाबासाहेबांपर्यंतचे सुधारणावादी लोक भारतातील ब्रिटिश राज्याला दलितांच्या दृष्टीने, दलितांचे मुक्तीदाते म्हाणतात. त्यांच्या मते ब्रिटिश राज्य भारतात आल्यावर ब्रिटिशांनी ज्या राजनीतिक व्यवस्थेला तडा दिला तीचे सर्व मुळे ब्राम्हणवादी होती.
विल्यम डिगबी एका जागी लिहतात कि, ब्रिटिश येण्याआधी दोनशे वर्ष, जे काही दुष्काळ, भुकमारी मुळे जीव जायचे, त्याच्या आकडा हा वर्षाला करोडो असायचा. यावर अमर्त्य सेन लिहतात कि, यात मृत्यू जाण्याचे एकमेव कारण होते, लोकांकडे अन्न विकत न घेऊ शकण्याची शक्तीच नसणे, मग विचार करा? वर्णव्यवस्थेत तळागाळाला असलेलावचं याला सर्वाधिक बळी जाणार ना!. त्यामुळे दुष्काळ, भूकमारीत सर्वाधिक बळी जाणारा हा दलित वर्गच होता.
त्यावेळी दलितांची सामाजिक परिस्थिती, ब्राम्हणवादी परंपरेमुळे जेवढी खराब होती, त्या परिस्थितीत दलित अस्मितेच्या कोणत्याही व्याख्याचा विनम्रपणे स्वीकार केला जाऊ शकतो किंवा विनम्रपणे त्याला नाकारू सुद्धा शकतो. परंतु मागील काही दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाने भीमा कोरेगावच्या मुद्द्याला राष्टवाद आणि राष्ट्रद्रोह या दोन मुद्द्यावर आणून सोडले आहे, जे कि खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत, मुळात लोकांना हा प्रश्न पडायला हवा, कि हे आताच का?.
चार वर्षात एक प्रश्न किती तरी वेळेस मीडियाने उभा केला आहे कि, भीमा कोरेगाव येथे जमणारी गर्दी ही पेशव्यांना हरवून ब्रिटिशांना राज्य जिंकून देणारी; ब्रिटिश्याच्या विजयाचे विजय दिवस साजरा करते, (जसे आजकाल करणी सेने यावर आक्रमक झालेली आहे.) त्यामुळे ही दंगल झाली. पण प्रश्न पडतो कि, काय खरंच पेशवा किंवा मराठ्यांचे सैनिक त्यावेळी ब्रिटिशांबरोबर देश वाचविण्यासाठी लढत होते, कि स्वतःचे राज्य? उत्तर स्वतःचे राज्य हेच असेल. म्हणजेच त्यावेळी राष्ट्रवादाचा जन्मच झालेला नव्हता. मग जर असे असेल तर कोणत्या आधारावर भीमा कोरेगावचीच्या अस्मितेचे लोक देशद्रोही ठरवले गेले?.
एकोणविसव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत भारत हा एक राष्ट्र असेल, या अस्मितेचा जन्मच झाला नव्हता. मराठे - पेशवे भारताकडून नव्हे तर आपल्या क्षेत्रीय राज्यकडून, सत्ता टिकवन्यासाठी लढत होते. आज जे टीव्हीवर बसून भीमाकोरेगावला जाणाऱ्या लोकांना आणि एल्गार परिषदेला राष्ट्रद्रोही घोषित करण्यामागे लागलेले असतात ते कसे विसरतात कि, आपल्याच देशात मराठ्यांनी- पेशव्यांनी त्या काळात आपल्याच देशील मैसुर, सुरत, पंजाब, लाहोर आणि अन्य आपल्याच लोकांशी युद्ध केले आहे.
वास्तविक पाहता गुलामानी आपल्या मालकासाठी नाही, तर स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे, 1818 ला महारांनी पेशव्याविरोधात हेच केले. आपल्या समाजाच्या गळ्यात मडकी आणि कमरेला झाडू बांधायला मजबूर करणाऱ्या आणि मानवचं नसलेल्या महारांच कोणतं राष्ट्र असू शकत कि, ज्याला वाचवीने त्यांचे प्रथम कर्तव्य असेल.
ज्याप्रकारे वर सांगितल्याप्रमाणे उजव्या संघटनांनी भीमा कोरेगावात जमलेल्या लोकांवर हल्ले केलेत, ते निश्चितच पेशवे - महार लढाईतील प्रतिक्रियावादाचे प्रतीक म्हणून झालेले हल्ले होते, यात शंका नाही. अलीकडे आरएसएसचे दोन धोरण प्रकर्षाने दिसून येतात. एक म्हणजे इतिहासाला जेवढं तोडक मोडक करून असहिष्णू बनवता येईल तेव्हढे बनवणे आणि दुसरे म्हणजे जे लोक त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध जातील त्यांच्या वर छुपे जीव घेणे हल्ले करणे. भीमा कोरेगावमधे दोन्ही प्रकारचे धोरण एकदाच वापरले गेले आणि हा संघर्ष दलितवाद विरुद्ध ब्राम्हणवाद असा न ठेवता, त्याला वळण देऊन दलित विरुद्ध मराठा असा दाखवला गेला.
- मनवर सुनील
(मुक्तपत्रकार)

.jpeg)