दि. 06 फेब्रुवारी 2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एका पत्रकाराची हत्या करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा एकच खळबळ उडाली.
काय चाललंय कोकणात?
कोकण हा फार पूर्वीपासूनच खूप सेन्सेटिव्ह मुद्दा राहिलेला आहे, कोकणातील विविध क्षेत्राच्या मुद्द्यावर, जैवविविधतेवर, तेथील भौगोलीक क्षेत्राच्या मुद्द्यावर आतापर्यंत बरेच अभ्यास गट नेमण्यात आले, त्यातील गाडगीळ अभ्यास गट आणि इतर सहा अभ्यास गटांनी कोकणातील जैवविविधतेच्या कारणाने आणि हा अतिशय सेन्सेटिव्ह भाग असल्यामुळे येथे भविष्यात कोणतेही घातक प्रकल्प आणू नये असा अहवाल दिला होता. म्हणजेच सरकारने नेमलेल्या सगळ्याच अभ्यासगटांनी कोकणातील सेन्सेटिव्ह भागावर पर्यावरणाला धोका पोहचेल असे प्रकल्प येथे आणू नये असा सल्ला दिला होता. परंतु सरकारने या अभ्यास गटांना केराची टोपली दाखवली आणि बऱ्याच घातक आणि मोठ्या प्रकल्पाना कोकणात आमंत्रण दिले, त्यामुळे संपूर्ण जगाच लक्ष कोकणातील जमिनीवर लागून आहे. त्यात जैतापूर अनु प्रकल्प, वाढवण बंदर, नाणार रिफायनरी प्रकल्प, एंरॉन दाभोळ प्रकल्प असे बरेच प्रकल्प आज कोकणाचा विनाश करायला येऊन टेकले आहेत. कोकनातील या सर्व घातक प्रकल्पाना कोकणवासियांनी सुरवातीपासूनच विरोध केलेला आहे, याची पार्श्वभूमी खूप जुनि आणि ऐतीहासिक आहे. कोकणातील लोक, कोकण वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध करत होते आणि अजून करत आहे. अलीकडील मोठे विरोध म्हणजे जैतापूर आणि नाणार प्रकल्प.
कोकणातील घातक प्रकल्प आणि त्याला स्थानिकांचा विरोध.
जैतापूर प्रकल्प हा अनुप्रकल्प आहे. अनुमुळे काय होऊ शकत याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरणं आहे जपानमधील हिरोसीमा आणि नाकासकी शहर, ज्याठिकाणी हे अनुस्फ़ोट झाले होते तिथे आजही गवत उगवत नाही. रशिया मधील चिर्नोबिल अनुभट्टी हे अगदी अलीकडले उदाहरणं आहे, ज्यातुन शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अश्याच प्रकारचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प जैतापूर अनुप्रकल्प आहे जो कोकणात तयार होतो आहे. त्यामुळे कोकणात स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करणे साहजिकचं आहे.
वाढवण बंदर प्रकल्प जो डहाणू तालुक्यात होत आहे, याला सुद्धा स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. समुद्रात साडेपाच हजार एकरावर माती टाकून हा प्रकल्प निर्माण होणार आहे, त्यामुळे 47 गावे स्थलांतरिक करावी लागतील. या साडेपाच हजार एकराच्या भरावामुळे आजूबाजूच्या गावात पाणी साचेल आणि त्यामुळे बरीच गावे पाण्याखाली जातील. दुसरी बाब येथील स्थानिकांचा व्यवसाय नष्ट होऊन ते बेरोजगार होणार आहेत.
नाणार प्रकल्प जो रिफायनरी प्रकल्प आहे आणि एकूण 15 हजार एकर जमिनीवर प्रस्थावित आहे. या 15 हजार एकर जमिनीसाठी 17 गावांना स्थलांतरीत कराव लागणार होते. स्थानिकांच्या मोठ्या विरोधानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला आणि राजपूर तालुक्यातच बारसु सोलगाव भागात हलविण्यात आला. लोकांना प्रकल्पच नको म्हटल्यावर स्थानिकांनी येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायला सुरवात केली आणि आजही 2011 पासून आणि 2019 नंतर सुद्धा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातं आहे. आता पर्यंत नेमण्यात आलेल्या अभ्यास गटांच्यानुसार जैतापूर आणि कोकण रिफायनरी प्रकल्प हे कोकणासाठी खूप घातक असतील, कारण हा संपूर्ण पट्टा हा भूकंपप्रवण क्षेत्राला लागून आहे.
कश्या झाल्यात कोकणातील प्रकल्पासाठी हत्या.
स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आणि सरकारने इतर देशाशी किंवा मोठ्या उद्योगपतीशी केलेला करार दोन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे ठरतात. लोकांनी विरोध केला तर सरकारने हे प्रकल्प करू नये हे जितके खरे आहे, तितकेच खरे सरकारनी लोकांचा विचार न करता, प्रकल्प जिथे तयार होणार आहे तिथला अभ्यास न करता कंपनीशी केलेला करार सुद्धा या सर्वात महत्वाचा ठरतो. म्हणजेच एकदा सरकारने करार केल्यावर सरकारला साम, दाम, दंड, भेद वापरून तो प्रकल्प कोणत्याही स्थितीत करायचा असतो. त्यामूळे मग दडपशाही आणि इतर शस्त्र वापरून जनतेला नामोहरण केले जाते आणि प्रकल्प उभा केला जातो, तो गलिच्छ राजनीतीचा एक भाग असतो, ज्यात कित्येक राजकीय लोकांचे स्वार्थ ठरलेले असतात.
नाणार प्रकल्पात गोळी मारून पोलिसांनी केलेली एका आंदोलकाची हत्या असो किंवा पत्रकार सचिन नार्वेकर किंवा पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या असो हे सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केलेली उठाठेव असते. 2011 ला पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेला तरबेज सोलकर, ज्यामुळे सरकारला आता तरी नाणारचा विरोध थांबेल असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही आणि स्थानिकांनी पुन्हा मोठया प्रमाणात विरोध केला, हा लोकांचा आआज दाबून टाकायचा प्रयत्न होता जो पूर्णपणे फसला. या सर्वात त्यावेळी पत्रकार सचिन नार्वेकर आणि अलीकडे पत्रकार शशिकांत वारिसे स्थानिकांसाठी आपल्या लेखणीतुन लढा देत होते. परुंतु सरकारला किंवा रिफायणरीमधे स्वार्थ असलेल्या लोकांसाठी ते जड जात होते.
बिल्डर लॉबी आणि भ्रष्ट पत्रकार.
नाणार प्रकल्प आणि त्यानंतर बारसु सोलगाव भागातील जमिनी प्रकल्पात जाणार म्हटल्यावर भूमाफिया आणि भ्रष्ट राजकीय नेते यात सक्रिय होणार ही काळ्या दगडावरची रेष असते. शेतकरी आणि स्थानिकांची जागा कंपनीला मिळवून देण्यासाठी असेच लोक या भागात आजही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यातीलच एक पंढरीनाथ आंबेरकर हे बिल्डर ज्याचे संबंध सत्तेतील बऱ्याच लोकांशी असल्याचे अलीकडे उघड झाले. त्यामुळे कोकण रिफायणरी विरोधक आवाज दाबून टाकायचे कोणते कोणते प्रयत्न होऊ शकतात हे उघड होते. पंढरीनाथ आंबेरकर हे कंपनी, राजकीय काही पुढारी आणि भ्रष्ट पत्रकार यांच्यामधील दुवा होते.
अश्यातच या सर्वाला अपवाद असलेले पत्रकार शशिकांत वारिसे यांनी रिफायनरी विरोधक आवाज देशभरात पोहचवन्याचे कार्य केले होते. त्यांनी बऱ्याचदा आंबेरकर यांच्यावर महानगर टाईम्स मधून वारिसे यांनी गंभीर आरोप केले होते आणि दि. 06 फेब्रुवारी 2023 च्या महानगर टाईम्समधे आलेल्या एका बातमीमुळे आंबेरकरयांनी पत्रकार वारिसे यांच्यावर गाडी चालवून त्यांची हत्या केली. सध्या सुरु असलेल्या चर्चेवरून आंबेरकरांनी ही हत्या स्थानिक राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून केली आहे, असे मत राज्य भर निर्माण झालेले आहे.
म्हणजेच सध्या रिफानरीमधे स्वार्थ असलेले पुढारी, कंपनी आणि बिल्डर कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात हे पत्रकार नार्वेकर आणि वारिसे यांच्या हत्येनंतर उघड झाले आहे. ज्या प्रकल्पाला लोक विरोध करताय तो प्रकल्प लोकांच्या भागात आणून सरकार काय साध्य करू पाहत असेल?. वारिसे सारख्या सच्या पत्रकारांच्या जीवाला इतकी कमी किंमत कशी असू शकते? पत्रीकारितेच्या पेश्याला धंदा समजणाऱ्या पत्रकारांना बघून लोकशाहीचा चौथा स्तंभ किती भ्रष्ट झालाय कळायला उशीर लागत नाही, अश्या पत्रकारांवर बहिष्कार घालने महत्वाचे ठरणार नाही का, जर आरोप सिद्ध होत असतील तर?. पंढरीनाथ सारख्या लालची माणसाला कोणती शिक्षा द्यायला हवी की ज्यामुळे कोकण उध्वस्त करायला लोक घाबरतील?. घाणेरड्या राजकारणाला आळा कसा घालता येईल की ज्यामुळे लोकांना लुटण्यासह त्यांची हत्या हे घडवून आणणार नाही?. असे बरेच प्रश्न आहेत, जे आज प्रत्येकाला पडायला हवेत कारण लोकशाही आणि सच्ची पत्रकारिता जिवंत राहायला हवी.
- सुनील मनवर

