भंडारा, गोंदिया, अमरावती, परभणी, बिड, पालघर ठाणे, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड, सोलापूर या भागात अजूनही या पेक्षा भयंकर स्थिती आहे, त्यांचं तर वर्णन सुद्धा करणं महाकठीण होऊन जातं. 2013 - 2052, 2014 - 2184, 2015 - 2304, 2016 - 2155, 2017 - 2153, 2018 - 2501, 2019 - 2371; ही महाराष्ट्रात दरवर्षी दलित आदिवासी लोकांवर होणाऱ्या गंभीर अन्यायाची यादी आहे. पोलीस स्थानाकात त्यांनी नोंदवलेल्या या केसेस आहेत ज्या कधी कागदावर उतरू शकल्या नाहीत त्या तर किती असतील अजून हे आश्चर्यच समजा. मी स्वतःच अनुसूचित जमाती मधून बिलॉंग करत असतांना आणि पत्रकारीता करत असतांना काही गोष्टी अनुभवल्या आहेतच. काही केल्या जात नाही ती जातं. समाजातील जातीअंध लोकांवर कुठल्याही प्रकारे सरकारचा आणि पोलीस यंत्रनेचा दबाव राहिलेला नाही आणि सध्याची सरकार फक्त बघ्याची भूमिका घेऊन मूग गिळून मुकाट्याने बसलेली असतें. त्यामुळे कित्येकदा सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात अन्यायग्रस्त लोक फक्त घोषणाबाजी आणि नारे देऊन धरन्यावर बसलेली आढळतात. कट कारस्थानाने सामूहिक हत्या करणे, जुन्या रूढीपरंपरा मानून दलित बहुजन समाजातील व्यक्तीला वाळीत टाकणे अथवा गावातील पूर्ण समाजावर बहिष्कार टाकणे, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणे, दलित बहुजनांच्या ध्वजाचा, श्रद्धास्थान असलेल्या प्रतिकांचा अवमान करणे, मानवी मूल्यांची अवहेलना करणे असले प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
अत्याचार येथेच संपतो का? तर नाही. अत्याचाराची इतकी छोटी व्याख्या असूच शकत नाही. पत्रकारिता करत असतांना यवतमाळातील एका गावात जाऊन पोहचलो जिथे, दलितावर अत्याचार होत नाही, आमचं गाव एकोप्याने आणि शांतीने नांदत असं मला सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात तस काहीच नव्हतं. पोलीस यंत्रनेची नाकामयाबी असो, सरकारी यंत्रणा अथवा स्वतः महिला बाल कल्याण विभागाची असो, ती गोष्ट दाबली गेली होती. यवतमाळ मधील एका गावात आदिवासी समाजाच्या एक तरुणीवर आठ वेळा बलात्कार अथवा संमतीने संभोग करून तिला कुमारीमाता बनविण्यात आले आणि प्रत्येकवेळी समाजाने, गावाने ते अनदेखे केले. पाहिल्या तीन गर्भधारनेच्या वेळी वृद्ध आई वडील जिवंत होते आणि त्यांनतर त्यांचे निधन झाले तेव्हा ती थोडी मानसिक आजाराने ग्रासली होती. समोरचे पाच गर्भ हे पोट भरणाच्या लालसे पायी, बळजबरीने, मानसिक आजारात गावातील व समाजातील जातंअंधानी तिला प्रदान केले. आजही ती तरुणी जिवंत आहे आणि अश्याच परिस्थितीत ती जगतेय. ही फक्त यवतमाळ आणि अमरावतीकडल्या गोष्टी झाल्यात याही पेक्षा भयानक असते गडचिरोली, भंडारा भागातील आदिवासी लोकांच्या मुलीवर व तिथल्या आदिवासिंवर होणारे अत्याचार. या भागात सरकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून जाणारे लोक, येथील स्त्रियांना आणि नाबालिक मुलींना आपल्या प्रेमाच्या नाटकात फसवून संभोग करतात आणि त्यातून त्या स्त्रियांना गर्भधारणा झाल्यावर तेथून पळ काढतात. हे सर्व प्रकरण एवढ्यातच थांबत का? मुळीच नाही. या गर्भधारनेतून मूल जन्माला आल्यावर किंवा अनैतिक गर्भधारणा झालीय कळल्यावर इथल्या स्त्रियाच आणि मुलींच आयुष्य बरबाद होऊन, ज्यात कित्येक स्त्रियांना आणि मुलींना आपल्या आयुष्याला मुखावं लागलं आहे. गोंदिया भंडारा भागात यापेक्षाही खूप भयानक भयानक स्त्रियाविषयी अत्याचार होत असतात. खैरलांजीची घटना तरइतकी भयानक होती कि त्याचे पडसाद स्वतः जागतीक संघटनेच्या मानवी हक्क आयोगाला घ्यावा लागला होता.
गुजरात बरोबरच महाराष्ट्रात सुद्धा दर चार दिवसाआड एक दलित स्त्रियांवर अत्याचार होतो आणि त्याचे नामोनिशाण मात्र कुठेच उरत नाही. मुक्तपत्रकारिता करत असतांना एक गोष्ट मात्र मला नेहमी जाणवते कि, दलित स्त्रीयांवरील अत्याचाराची दखल हव्या त्या प्रमाणात समाजातील माध्यमे घेतांना दिसत नाहीत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील दलित स्त्रियांवरील अन्यायाची गोष्ट कधीच या कानाहुन त्या कानाला होत नाही. कित्येक स्त्रिया स्वतःच्या जाती बरोबरच इतर जातीतील लोकांनाकडून शारीरिक व मानसिक दृष्ट्या रोज छळल्या जातात आणि त्यातील बरेचश्या याकारणातून आत्महत्या करुण घेतात. दलित समाजातील स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि त्यातून उद्धभवणारे कित्येक प्रश्न आज सुद्धा तसेच कोर्टाच्या पायरीवर टांगत ठेवले आहेत. कित्येक सुनवाण्या होतात आणि कित्येक निर्णय दिले जातात परंतु त्या स्त्रियांच्या अब्रूची किंमत नेहमी न्यायालय सुद्धा शून्यच ठेवत असतो. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दलितांवर होणारे अन्याय बघता आणि त्यावर होणारी कार्यवाहीचा विचार करता पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल अधोगामीकडे तर होत नाही ना याचा विचार करावा लागेल. 15 ऑगस्ट 2021 ला स्वातंत्र्याची 75 वी साजरी करत असतांना फक्त 500 रुपयाच्या वेटबिगारी वरून 20 ऑगस्ट 2021ला पालघरमध्ये कोणाला तरी जीव द्यावा लागतोय ही खूप लाजिरवणी बाब आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही आदिवासी कातकरी शेत मजुराला वेठबिगारीच्या पाशात अडकल्याने जीव गमवावा लागल्याची घटना पालघर जिल्ह्यात अलीकडे घडली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एका मजुराने आपल्या मुलाच्या अंतविधी साठी 500 रुपये मिळविण्यासाठी वेठबिगारी करावी लागली ही स्वातंत्र भारतासाठी खूप लज्जास्पद आहे. मानवीअधिकाराचा उल्लंघन करून ही सिस्टिम चालतेय,बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६ सारखे अनेक कायदे फक्त नावाला बनवून कागद छापले आहे त्याची अंमलबजावणी केली जातं नाही याचा पत्रकार म्हणून खेद वाटतो.
ही फक्त एवढीच घटना नाही, अश्या भयंकर घटना रोज पालघर मध्ये घडत असतात. मागील काही दिवसापूर्वी शहापूर जिल्हा ठाणे ग्रामीण रुग्णालयात आलेली केस यापेक्षा भयानक होती. दोनम मुलींचा मृत्यु गूढरित्या एकत्र झाला होता आणि ग्रामीण रुग्णालय ती केस हाताळायला तयार नव्हते, कारण होते त्यांना त्या मुलींचा मृत्यू कश्याने झाला हे लिखित हवे होते. विचाराची गोष्ट ही आहे कि, मुलींच्या घरच्यांनी कारण दिल कि त्या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या आणि त्यामुळे त्यांनी सोबत आत्महत्या केली. काही केल्या ही गोष्ट पचत नाही कि, खरच त्यांच्या मृत्युच कारण हेच असू शकत. मात्र वास्तविकता या पेक्षा भयानक असते. त्या मुलींचा मृत्यु वेगळ्या कारणाने झाला होता आणि उच्चवर्गीय सत्ता हाती बाळगनाऱ्या गुन्हेगाराच्या भीतीला अथवा अमिशीला त्यांचे मुलींचे नातेवाईक बळी पडले होते त्यामुळे त्यांनी तसे कारण नोंदविले. वर्षानुवर्षे पीळलेल्या आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या हा दलित आदिवासी समुहाच खूप मोठा घटक किती अन्यायाने ग्रस्त आहे हे इथून कळते.
चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात झालेली घटना सुद्धा मानवाधिकाराला डावलनारी आणि माणुसकीला काळिमा फासणारीच होती. वाणी गावातील सवर्ण लोकांनी दलित आदिवासी कुटुंब भानामती किंवा जादू टोणा करते या संशयावरून त्यांना बांधून जखमी होई पर्यंत मारण्यात आले. काही वर्ष्याआधी याचं कारनावरून भंडाऱ्यात खैरलांजी हत्याकांड घडले होते ज्यात अख्या घराची हत्या करण्यात आली होती. वाणी गावात झालेल्या या छळासाठी कोणीही आवाज उठवला नाही, यामुळे दलितांवर अन्याय वाढत जाईल आणि नराधमला अन्याय करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. काही केल्या दलित अत्याचार रोखण्यात सरकार यशस्वी होतांना दिसत नाही, किंबहुना सरकार त्यासाठी ठोस पाऊल उचलायला तयार नाही. यात फक्त महाराष्ट्राचा चंद्रपूर, पालघर ठाणेच आघाडीवर आहे असे मुळीच नाही. मार्क्स जर कुठे शिकायचा आणि प्रत्येक्षात अनुभवायचा असेल तर वर नमूद केलेल्या क्षेत्रात किंवा जिल्हातील त्या भागात कधीतरी फेरफटका मारा, कार्ल्स मार्क्स किती सत्य सांगून गेला कळेल. तेव्हा ठाणे पालघर, नाशिक नंदुरबार, अमरावती यवतमाळ, औरंगाबाद नांदेड, चंद्रपूर भंडारा ही जुळी दलित शहर मार्क्सनीच उदाहरनासाठी सोडून गेलीय असं वाटायला लागते.
अयान शेख, मुंबई
Izteeraab@gmail.com
