आजकाल सगळीकडे अफगाणिस्तानातून वायरल झालेले फोटो फिरत आहेत. तालीबान अफगाणिस्तानच्या काही प्रमुख रस्त्यावरील आपल्या छावन्यांच्या माध्यमातुन कट्टरपणे अफगाणिस्तानावरील आपल्या हक्काचा दावा करत आहे. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानातील खूप साऱ्या लहान मोठ्या शहरावर तालीबानचे नियंत्रण प्रस्थापीत झालेले आहे. ज्या रस्त्यावर तालीबानी सदस्य डेरा जमवून बसलेले असून त्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहणांना ते अडवून प्रत्येक नागरिकाला काही प्रश्न विचारतं आहेत. तालीबानच्या या सदस्यांना अफगाणिस्तानच्या सरकार मधे असलेली लोकं सध्या हवी आहेत, त्यांच्या शोधकार्यासाठी तालीबान आतुर झालेला आहे. या मंत्री आणि खासदारांना धरून तालीबान त्यांच्यावर तालीबानी धार्मिक न्यायालयात खटले चालवेल व मिळालेली शिक्षा त्यांना भोगायला भाग पाडेल. कोणाला काय शिक्षा मिळेल यावरून समोर या अफगानी संसदेच्या सदस्यांचं भविष्य ठरणार आहे. दुसरीकडे अमेरिकेने घोषणा केली आहे कि, अफगाणिस्तानमधे असलेले अमेरिकि सैन्य पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजेच सप्टेंबरला अफगाणिस्तानातून पूर्णपणे परत बोलविण्यात येईल. मुळात अमेरिकि सैन्य परत बोलवण्याचा शेवटचा कालावधी मे 2021 होता परंतु अमेरिकेने सैनिक जरी माघारी बोलवने त्या आधीच चालू केले असले तरी ते पूर्णपणे माघारी बोलाविले नव्हते. तालीबानी सद्धा कोणत्याही गोष्टी करण्यासाठी कंबर कसून तयार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते शांतीसाठी सुद्धा तत्पर आहेत आणि जिहाद करण्यासाठी सुद्धा; निवडायचे अफगाणिस्तानला आहे कि, त्याला कोणता मार्ग योग्य वाटतो. जिहाद ईश्वरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे आणि ते कितीही केले तरी देव थकू देत नाहीत असे तालीबानी जिहादीना वाटतंय.
सांगायची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तान मधे स्वतःच एक संविधान आहे जे 2004 साली लागू करण्यात आलं. त्यात स्पष्ट सांगितले आहे कि अफगानी संविधान हे तीन गोष्टी वर टिकून राहील अफगाणिस्तान एक मुस्लिम गणराज्य असून स्वातंत्र्य, एकात्मता आणि अविभाज्य राज्य या त्या तीन गोष्टी त्यात असतील. अफगाणिस्तानचा धर्म इस्लाम असला तरी अफगाणिस्तानामधे संविधानात सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना आप-आपले धर्म मानण्याची व आचरण करण्याची परवानगी असेल. मुळात जर आपण आधुनिक अफगाणिस्तानकडे बघितले तर अफगाणिस्तान आधुनिक प्रवाहाकडे वाहतांना दिसतो आणि त्यासाठी जुन्या रूढी परंपरा आणि देशाच्या विकासाला बाधा पोहचू शकेल अश्या गोष्टीना दुर्लक्षित करण्याकडे तो झुकलेला आहे असे वाटते, खरं तर हेच तालीबानला नको झाले आहे. तालीबान आता स्वतःला एकादया गट किंवा समुहाच्या रूपात बघत नाही; सध्या तालीबनाला वाटते कि तालीबान आता तालीबान राहिले नसून ते 'इस्लामिक अमीरात ऑफ़ अफ़ग़ानिस्तान' झाले आहे त्यामुळे आता तालीबान स्वतःला जगासमोर वेगळ्याप्रकारे रिप्रेजेंट करतांना दिसतोय. पण वास्तविक पाहता तालीबान एक दहशतवादीच गट आहे आणि तो तसाच राहणार आहे. एखादया लोकशाही राज्यावर सशस्त्र कब्जा करणे म्हणजे आपण अहिंसक झालोय असं कधीच होऊ शकत नाही. 1996 च्या जावळपास तालीबानने असाच काहीसा प्रयन्त केला होता तेव्हा तालीबानी गट सत्तेत सुद्धा होता. परंतु 2001 ला तालीबानच्या याच कर्तृत्वापायी तालीबानला सत्तेतून हाकलून देण्यात आले, त्याचाच प्रतिशोध आज त्यांनी घेतलाय. पण फक्त तालीबानला सत्ता मिळतेय असे तालीबानला वाटू लागल्यावर हे सर्व तालीबानला आलेले डोहाळे आहेत हे सुद्धा तितकंच खरं वाटत.
तालीबानच्या हिंसक सैन्याने खूपच कमी कालावधीत अफगाणिस्तान वर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे.
अश्या स्थितीतुन स्वत:ची सत्ता वाचवण्यासाठी अफगान सरकारने तालीबानला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बोलणी केली होती मात्र तालीबानला आता कळून चुकले आहे कि सर्वच सत्ता आपल्या हातात आली असल्यामुळे दुसऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारणे मूर्खपणाचे होईल. तसेही तालीबान ने कालपर्यंत अफगाणिस्तानच्या 34 प्रांतापैकी 33 प्रांत आपल्या नियंत्रणात घेतले आहे त्यात हेरांत प्रांत महत्वाचा मानला जातो. अफगाणिस्तानच्या सैन्याविषयी बोलायचं म्हणजे ऑफिशियली अफगाणिस्तानकडे 3.50लाख सैन्य आहे, मात्र अफगान तालीबान संघर्षात फक्त 2.50 लाख सैन्य उतरविले गेल्याचे कळते. अफगाणिस्तानकडे 162 लडाकू विमान आणि हैलीकॉप्टर असून एमआय 35 आणि ब्लैक हॉक्स 40 आहेत. सोबतच स्वतःच वायुदल असतांना सुद्धा तालीबान अफगाणिस्तानवर भारी पडल हे नवलच.तालीबानने आपले 80 हजार सैनिक संघर्षात उतरवले होते आणि अफगाणिस्तानकडे असलेली वायू सेना सोडता सर्व उपकरण, शस्त्र आणि दारुगोळा तालीबानकडे उपलब्ध आहे. तालीबानची सर्वात मोठी ताकत म्हणजे, पाकिस्तानी सैन्य. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटणेकडून तालीबान केली जाणारी मदत त्याच बरोबर कट्टर इस्लामिक राज्य आणि जनतेकडून त्यांच्या विचाराला मिळणारे खतपाणी.
काय आहे तालीबान आणि तालीबानची पार्श्वभूमी?
"[तालीबान अफगाणिस्तान संघर्ष्यात अतंत्य कमी कालावधीत 1,031 नागरिक ठार झाले तर 2,043 नागरिक जखमी झाले आहेत त्याच बरोबर 244,000 नागरिक विस्थापित झाले आहेत.तालीबानने नियंत्रित केलेल्या जिल्ह्यांची संख्या 73 वरून 223 सध्या झाली आहे. 6 ऑगस्ट पर्यंत तालिबानने अफगाणिस्तानच्या 33 प्रांतीय राजधानींवर कब्जा केला होता आणि 10 ऑगस्टपर्यंत तालिबानने देशाच्या 65% क्षेत्रावर ताबा मिळवला होता.]"
तालीबान निर्मितीची दोन कारणे सांगितली जातात पण वर्तमान स्थिती बघता अमेरिकेनेच तालीबानची निर्मिती केली यात शंकाच उरत नाही. 1978 च्या दरम्यान तेव्हाच्या सोवीयत संघाने आणि आताच्या रशियाने अफगाणिस्तानावर हल्ला केला आणि त्यामुळे रशियाकडे असलेल्या आधुनिक शस्त्र आणि मनुष्यबळामुळे खूप मोठ्या क्षेत्रावर त्याला नियंत्रण प्रस्थापीत करता आले. अमेरिकेला ते नको होते त्याचे कारण सुद्धा तसेच. अफगाणिस्तान हा आशिया आणि युरोपला जोडणारा महत्वाचा दुवा होता. त्यामुळे ज्याच्याबाजूने अफगाणिस्तान असेल त्याच बाजूने आशिया झुकलेला असेल हे तेवढंच महत्वाचं होत. दुसरीकडे रशियाला परत धाडायचं म्हणजे अमेरिकेला पाकिस्तानची मदत लागणार होती आणि त्यातूनच पाकिस्तान मधल्या कट्टर धर्मअंधाची, सैन्य अधिकाऱ्यांची व गरीब लोकांची तालीबान नावाची संघटना स्थापण करण्यात झाली. ही संघटना फक्त आणि फक्त जिहादसाठी काम करायची. अमेरिकेला आशिया हवा होता आणि त्यामुळे अफगाणिस्तानवर तो कोणाचीच सत्ता येऊ देऊ शकत नव्हता. त्यामुळे रशियाला अफगाणिस्तानमधून माघारी धाडण्यासाठी पाकिस्तानची ही धर्मांध संघटना त्या कामी पुढे आली. तालीबान संघटनेला आधी जिहादच्या नावावर कट्टर बनविण्यात आले आणि अफगाणिस्तानातील रशिया विरोधात लढण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तहेर एजेन्सी कडून शस्त्र आणि पैसा पुरवठा केला गेला. त्यावेळी मुस्लिम धर्मावर संकट आले आहे आणि त्यासाठी तालीबान संघटना सज्ज केली गेली आहे हे अमेरिकेच्या कुटनितिमुळे लोकांना व अरब सारख्या कट्टर इस्लामिक देशाला वाटले आणि इस्लामिक राज्यांनी मोठ्या प्रमानात तालीबानला शस्त्र, पैसा आणि भावनिक आधाराने मदत केली आणि अश्याप्रकारे तालीबान धार्मिक दृष्ट्या कट्टर होत गेले. अफगानी पश्तो भाषेत तालीबान म्हणजे विद्यार्थी. असे म्हटले जाते कि पश्तून लोकांनी तालीबान संघटना सुन्नी इस्लामिक धर्माची शिकवण व प्रचार करण्यासाठी स्थापन केली होती. त्यावेळी या संघटनाना धार्मिक बाबीला खतपाणी देण्यासाठी म्हणून धार्मिक आतंकवाद निर्माण करण्यासाठी सौदी अरब फंडिंग करत होता. संघटना स्थापनेच्या सुरवातीला तालीबानने आपण इस्लामिक देशात शांती आणि सुरक्षितता स्थापन करणार आहोत अशी ग्वाही दिली होती. त्याच बरोबर जगात इस्लामिक कायदयांना आधार म्हाणून सरकार स्थापण करायचे प्रयत्न त्यांनी केले आणि त्यासाठी त्यांनी हिंसा सुद्धा केली.
2001 साली अमेरिकेच्याच नेतृत्वाखालील नाटो सैन्याने तालीबानला अफगाणिस्तानच्या सत्तेतून हाकलून लावले. त्यानंतर अमेरिकेने कटकारस्तानातून स्थापन केलेली ही संघटना त्याच्याच विरोधात जाऊन अधिकच पॉवरफूल बनली आणि यातूनच तालीबानने अफगाणिस्तानच्या खूप मोठ्या भूभागावर अनैतिकपने नियंत्रण बसवीले. अफगानिस्तानमधे मागील दशकापासून पाळत ठेवुन असलेले अमेरिकी सैन्य आता अमेरिकेकडे परत फिरत असतांना, अमेरिकेच्या या सैन्य माघारानंतर तालीबानने मानवी हिंसा करत अमेरिकेचे सैन्य गेलेल्या ठीकानावर जबरदस्तीने नियंत्रण जमविले आहे. अमेरिका आणि तालीबान यांच्यात 2020 ला एक करार करण्यात आला, त्यात दोन्ही पक्षांनी त्याला मान्यता दिली. या करारानुसार अमेरिका आपले सैन्य अफगाणिस्तानमधून परत नेईल आणि तालीबान अमेरिकी सैन्यावर हल्ले करणार नाही असे ठरले होते. त्याच बरोबर तालीबान अल कायदा आणि इसीस सारख्या संघटनांना तालीबानी क्षेत्रात फिरकू देणार नाही व आपल्या क्षेत्रात शांतता निर्माण करेल असे ठरले होते. करारानुसार तालीबानने आपल्या क्षेत्रात शांतता स्थापित करायला हवी होती पण त्या कराराचा हा मुद्दा खोडत तालीबानने अमेरिकी सैन्य परत गेलेला भाग जबरदस्तीने हिंसा करत नियंत्रनात आणले आहे.
1998 सालापर्यंत तालीबानने अफगाणिस्तानवच्या 90% भाग आपल्या ताब्यात घेतला होता. त्यावेळी तालीबानने भ्रष्टाचार संपविण्याचे, कायदे मजबूत करण्याचे, रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे व त्या भागाचा विकास कारण्याचे वचन तिथल्या स्थानिक लोकांना दिले होते त्यामुळे अफगानी जनता तालीबानकडे आकर्षित होणे साहजिकच होते. परंतु असे काहीही झाले नाही. तालीबानने त्या क्षेत्रात शरिया कायदा लावून हजारो लोकांच्या अनैतिक संबंध आहे म्हणून हत्या केल्या, चोराच्या शरीराचा भाग कापला, लोकांना कढईत तळलं एवढ्या भयानक शिक्षा दिल्या. माणसांना धाढी वाढवणे व स्त्रियांना बुरखा घालणे अनिवार्य करण्यात आले, टीव्ही, चित्रपट व संगीत ऐकण्यास बंदी घालण्यात आली. दहा वर्षावरील मुलींना शाळेत पाठवने बंद करण्यात आले. याचं कालावधीत तालीबानवर मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी मोठे मोठे आरोप करण्यात आले परंतु तरीही तालीबानने याकडे लक्ष दिले नाही. तालीबानने आपली सर्व मर्यादा तेव्हा ओलांडली जेव्हा 2001 मधे अफगाणिस्तानमधील एक भलीमोठी बुद्ध मूर्ती त्यांनी बॉम्ब लावून उडवून टाकली. त्यामुळे हळूहळू लोक तालीबानी लोकांपासून दूर होत गेलेत आणि खऱ्या अर्थाने तालीबान जगाच्या नजरेत आतंकवादी गट म्हणून समोर यायला लागला.
पाकिस्तान त्या देशापैकि एक आहे कि ज्याने तालीबान निर्मिती पासून तालीबानच्या अफगाणिस्तानमधील सत्तेला मान्यता दिली आहे. त्यात पाकिस्तान, सौदी अरब आणि युएई या देशाचा सामावेश होता. अमेरिकेचे हे पिल्लू पाकिस्तानच्या गर्भात जन्माला आले होते. तालीबाननेच खूप साऱ्या हिंसक घटना त्यानंतर घडविल्या त्यांनी स्वतचा देश पाकिस्तान सुद्धा सोडला नाही. त्यात सगळ्यात हिंसक घटना म्हणजे मलाला युसूफझाईवर झालेला हल्ला व त्यानंतर पेशावर येथे एकाच वेळी 148 लहान शाळकरी मुलांना गोळी घालून मारण्यात आले ते. विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे कि या नंतर जरी तालीबानी संघटना पाकिस्तानी नागरिकांच्या मनातून उतरली असली तरी पाकिस्तान सरकारने तिचा साथ कधीच सोडला नाही आणि नंतरच्या काळात यातूनच अमेरिकेने पाकिस्तानच्या तालीबानशी संबंध असलेल्या खूप साऱ्या नेत्यांना ड्रोनद्वारे मारून टाकले. मुळात तालीबानला जन्म देणारा अमेरिका तालीबानमुळे तेव्हा कंटाळला जेव्हा अमेरिकेच्याच नाकी नऊ तालीबानने आणले. 11/9 ला जेव्हा अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदाच्या ओसामाबिन लादेनने हल्ला केला तेव्हा लादेनला आसरा देण्याचे काम तालीबानने केले. 7 ऑक्टोबर 2001 पासून अमेरिकी सैन्यानी अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा काहीच दिवसात तालीबानच्या नाकी नऊ आले होते आणि तालीबान खिळखिळीत झालं होत. प्रचंड संघर्षानंतर सुद्धा
तालिबानचे संस्थापक मुल्ला मुहम्मद उमर आणि ओसामा
बिन लादेन सह खूप सारे तालीबानी लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी त्यावेळी पाकिस्तान मधल्या क्वेटा शहरात आसरा घेतला होता परंतु पाकिस्तान सरकारने त्यांची कोणतेही माहिती पुरविण्यास नकार दिला.
तेव्हापासून तालीबान अफगाणिस्तानच्या सत्तेत परत येण्यासाठी धडपड करतो आहे. 2013 च्या आसपास तालीबानी प्रमुखांचा मृत्यु झाला परंतु तरीही तालीबानने जगासमोर दोन वर्ष ही गोष्ट गुप्त ठेवली आणि त्यानंतर काही वर्ष्यात ओसामाला मारण्यात आले. त्यानंतर मन्सूरला तालीबानी नेता बनविण्यात आले परंतु ओसामाच्या शोधमोहिमेच्या वेळी ड्रोन हल्ल्यात तो पण मृत्यूमुखी पडला आणि तालीबानचा प्रमुख हिबतुल्लाह अखुंदजादाला बनविण्यात आले. वर्ष 2001 च्या आसपास अमेरिकेने पुन्हा अफगाणिस्तानात लोकशाही आधारित सरकारची स्थापना केली, तालीबान याकडे पूर्णपणे लक्ष देऊन होता आणि आपली सरड्याची चाल चालत होता आणि यातूनच आपल्या प्रभावाने तालीबान अफगाणिस्तानच्या मोठा भागावर नियंत्रण बसविण्यात यशस्वी ठरला. साल 2001 नंतर अफगाणिस्तानात सगळ्यात जास्त हिंसक घटना घडल्या आहेत. तालीबान आता मोठ्या शहरांत किंवा मोठ्या टार्गेटवर हल्ले करत नाही, तालीबानने आता आपली रणनीती बदलवली असून आता तो सामान्य नागरिक, पत्रकार, जज, मानवाधिकार कार्यकर्ते आणि प्रगतीशील महिलांना टार्गेट बनवतो. भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दीकी आणि कॉमेडियन नजर मोहम्मद यांची हत्या त्याच रणनीती मधूनच तालीबानने केली
तालीबान संघटनेची सध्यस्थिती -
1) अमीर अल-मुमिनीन - हा तालिबानी संघटनेचा सर्वात महत्वाचा नेता असतो, जो राजनैतिक, धार्मिक आणि सैन्य बाबतीत गोष्टी सांभाळतो. सध्या या पदावर हिबतुल्लाह अखुंदजादा हे आहेत. हा पूर्वी याचं संघटनेत मुख्य न्यायाधीश म्हणून होता.
2) राजनैतिक सहाय्यक - अब्दुल गनी बरदार हा अखुंदजादा यांचा राजनैतिक सहाय्यक आहे. जो तालीबानचा उपसंस्थापक होता आणि सध्या तालीबानी राजनैतिक कार्यालयाचा प्रमुख आहे.
3) सहाय्यक- सध्या तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुहम्मद याकूब या पदावर आहेत आणि ते तालीबानी सैन्याचे प्रमुख असतात
4)सहाय्यक- अजून एक सिराजुद्दीन हक्कानी हे आहेत.
5)मुख्य न्यायाधीश- तालीबान चे मुख्य न्यायाधीश सध्या अब्दुल हकीम हे आहेत जे, न्याय प्रणालीचे प्रमुख आहेत.
6)रहबरी शूरा- हा तालीबानी नेत्यांची संघ असतो ज्यात 26 सदस्य असतात आणि ही समिती संघटनेच्या बाबीविषयी निर्णय घेणारी सर्वात महत्वाची समिती आहे.
तालीबानच्या कॅबिनेटमधे 17सदस्य असतात,ज्यात सैन्य, गुप्तवार्ता, राजनीति, अर्थ आणि अन्य 13 मंत्रालयाचा सामावेश होतो, दोहा येथे तालिबानचे मुख्यालय आहे. सध्या तालीबानकडे पैश्यांची काहीही कमी नाही, तालीबानची आवक ही ड्रग्स, खनन, वसुली, टॅक्स, धार्मिक दान, निर्यात, रिअय इस्टेट आणि रशिया, इराण, पाकिस्तान आणि अरब देशाकडून होणारी फंडिंग आहे. एकेकाळी ज्याला देशाला खदेडून काढण्यासाठी अमेरिकेने तालीबान बनविले होते आज तोच देश अमेरिकेला नाकी नऊ यावे म्हणून तालीबानला फंडिंग करतोय हे महत्वाचं.
अयान शेख, मुंबई
(मुक्तपत्रकार)
Izteeraab@gmail.com