गोद्री कुंभ म्हणजे बंजारा समाजाला जबरदस्तीने हिंदू घोषित करण्याचे षडयंत्र..

 


महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या 14% असलेला समाज, भारतात एकूण 12 कोटी लोकसंख्या असलेला समाज म्हणजे बंजारा समाज. महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकूण भारतातील एकूण राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यापैकी महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही बंजारा समाजाच्या राजकारनाची महत्वाची राज्य आहेत. महाराष्ट्रात विमुक्तजाती आणि तेलंगणात व उत्तरप्रदेशमधे हा समाज अनुसूचित जमातीत मोडतो. महाराष्ट्रात 12 वर्ष मुख्यमंत्रीपद वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक यांच्या नावाने याचं समाजाकडे होते.

सध्या चर्चा आहे खान्देशमधे भरलेल्या गोद्रीयेथील बंजारा कुंभमेळ्याची. 2024 मधे भारतात लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी संघपरिवाराने मागील काही दिवसापासून हिंदूंच्या मताचे समीकरण बनवायला सुरवात केलेली आहे. 
वर सांगितल्याप्रमाणे बंजारा समाज हा विविध राज्यात आदिवासी समाज म्हणून गृहीत धरला जातो. संघाच्या नवीन समजेनुसार आदिवासी समाज हा हिंदूचा हिस्सा आहे असे ते म्हणतात. याच समजुतीच्या आधारावर संघाने देशातील आदिवासी समाजाचे पहिले महाकुंभ खान्देशमधे गोद्री येथे आयोजित केले आहे. या महाकुंभाला हिंदूंच्या मोठ्या मोठ्या धर्मगुरूसह, योगी आदित्यनाथ आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत सह अनेक संघाच्या लोकांनी तसेच तेलंगाना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ़, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांनी या कुंभमेळाव्यात हजेरी लावलेली आहे. 

2024 ला संघाला पुन्हा सत्ता स्थापन करायची असल्यामुळे आणि काश्मीर, राम मंदिर सारखे महत्वाचे मुद्दे संपल्यामुळे हिंदूना एकत्रित करून हिंदूराष्ट्राच्या घोषणेकडे वाटचाल करण्यासाठी हालचाल चालू झालेली आहे. यात काल मुंबईत निघालेला आणि त्या आधी जागोजागी झालेला हिंदू विराट मोर्चा असो, बागेश्वरबाबा सारख्या लोकांना लॉन्च करणे असो, देशात एकदाच जागोजागी मोठ्या मोठ्या लोकांचे प्रवचन कीर्तन ठेवून गर्दी गोळा करणे असो, मागच्या सहा महिन्याआधी जागोजागी भरवलेली हिंदू सभा असो कि, आदिवासीना हिंदू घोषित करण्यासाठी आता बंजारा समजाचे भरवलेले गोद्री येथील कुंभमेळावा असो सर्व ओरडू ओरडून एकच सांगतात कि हे हिंदूना संघटित करण्याचे कार्य चाललेले आहे.  

मुळात सध्या बंजारा समाजात दोन प्रवाह पडलेले दिसतात. एक स्वतःला हिंदू समजणारा तर दुसरा बंजारा ज्याला गोर म्हटलं जातं, गोर हाच स्वतःचा धर्म असा म्हणणारा. त्यामुळे अलीकडे गोद्री कुंभाच्या पार्श्वभूमीवर या समाजात दोन वैचारिक प्रवाह वाहू लागले होते. त्यात सध्या स्वतःला हिंदू म्हाणणारे आणि स्वतःभोवती एक मोठा बंजारा समुदाय घेऊन चालणारे धर्मगुरु बाबुसिंग महाराज, पोहरागड जे सध्या महाकुंभात सहभागी आहेत. तर दुसरा एक प्रवाह जो आधुनिक विचारांचा, हक्कासाठी लढण्याऱ्याचा आणि संशोधन करून गोष्टी वर विश्वास ठेवणाऱ्यांचा आहे. ज्यात मोठे मोठे प्राध्यापक, शिक्षक, लेखक, विचारवंत, कवी, संशोधक इत्यादि क्षेत्रातील त्यात आहेत. यात भीमणीपुत्र मोहन नाईक, शिक्षिका जिजाबाई राठोड आणि अन्य आधुनिक समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत ज्यांना बंजारा समाज हिंदू असल्याजे मान्य नाही आणि ते संशोधन करून सिद्ध करू पाहत आहेत. 

अलीकडे अभ्यासक आणि  इतिहासकारांनी बंजारा समाजाचा जो इतिहास समोर आणला त्यानुसार बंजारा समाज सिंधू संस्कृतीचे वारसदार आहेत असे म्हटले जाते. ही सिंधू संस्कृती म्हणजे आज पासून १०००० वर्ष जुनी संस्कृती. तेव्हा हिंदू धर्माचा उगम झालेला नव्हता आणि नेमका हिंदू म्हणजे काय हे सुद्धा कोणाला माहित नव्हते.

महाभारत आजपासून ४००० वर्षापूर्वी घडले आणि हिंदू पद्धती, धर्माचा उगम हा ५०६७ वर्षा पूर्वी झाला. जर बंजारा समाजाचा इतिहास सिंधू संस्कृतीशी जोडला गेला तर, बंजारा समाज हिंदू धर्माचा भाग मुळीच नाही. म्हणून बंजारा समाजाचा स्वताचा धर्म असायला पाहिजे किंवा त्यांची स्वतःची जीवनपद्धत असायला हवी. म्हणुनच बंजारा समाजाचा धर्म हिंदू नसून गोर धर्म आहे हे आज प्रत्येक बंजारा बांधवाने समजून घ्यायला पाहिजे.

       जर हिंदू धर्म ५००० वर्ष जुना आणि सिंधू संकृती १०००० वर्ष जुनी असेल, तर बंजारा जो गोर म्हणून संबोधल्या जातो, याचा अर्थ गोर धर्म हिंदू धर्मापेक्षा ५००० वर्ष जुना आहे. हिंदू धर्मात असलेल्या मंत्र उच्चाराला गोर धर्मात कुठेच स्थान नाही, जर बंजारा  हिंदू आहेत तर त्यांच्या धार्मिक कार्यात मंत्रउच्चारण का नाहीत?. देवी देवता या समाजात अलीकडे  रूढ झाल्या आहेत, त्याआधी फक्त निसर्गपूजा येवेढेच काय ते बंजारा समाजात होते.

१०००० वर्ष जुनी परंपरा म्हणजे पशुबळी देणे ती आज सुद्धा गोर धर्मात आहेच. हिंदू धर्मात कोणत्याच देवाला पशुबळी होत नाही. ( वास्तविक ही बळी देवीसोबत असलेल्या राक्षसाला दिली जाते असं हिंदू धर्म म्हणतो) हिंदू आणि गोर धर्माची संकृती, रिती, रिवाज कुठेच मिळत नाही. ते आज जरी थोड्या प्रमाणात मिळत असले तरी ते  बंजारा समाज वस्ती करून राहून लागला आणि त्याचे संबंध हिंदूशी जास्तीत जास्त आले त्यामुळे अन्यथा नाही.

काळानुसार जेव्हा सिंधू संकृती पुराच्या खाली दाबली गेली ( सिंधू संकृती नष्ट होण्याची करणे अशी सांगितली जातात- पुरामुळे, दुष्काळामुळे, आर्याच्या अतिक्रमणामुळे) त्यातून जे काही लोक वाचले असतील नंतर ते तो भाग सोडून इतर ठिकाणी स्थानांतरीत झालेत. गोर लोकांचा व्ययसाय त्यावेळी शेती आणि पशुपालन होता, तो आज पण तसाच आहे, (मध्यकाळात तो घोड्यावरून धान्य नेऊन बाजारात विकणे होता). निसर्गपूजा आज पण गोर धर्म करतो.

            ज्या प्रकारे हिंदू धर्माची स्वताची जीवन पद्धत आहे, लग्न लावण्यासाठी ब्राम्हण, केस रचणेसाठी न्हावी. शुभ प्रसंगी वाद्य वाजविण्यासाठी मांग महार. त्याच प्रमाणे गोर धर्मात लग्न लावण्यासाठी वडत्या, केस रचणे साठी स्वताचा न्हावी, वाद्य- डफडे वाजविण्यासाठी ढाडी. अश्या प्रकारची स्वातंत्र्य  जीवन पद्धत बंजारा लोकांची आहे.  सांगायचे म्हणजे हिंदू धर्म आणि गोर धर्म किती वेगळे आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन वेगवेगळ्या त्यांच्या जीवन पद्धती.

बंजारा म्हणजे बनजारा, वनचारा. म्हणजेच वनात राहणारा, वनाने फिरणारा. ब्रिटिशांचे लक्ष जेव्हा भारतीय वनावर गेले तेव्हा ब्रिटिशांनी गुन्हेगारी कायदा आणून इतर बंजारा समुदायासह वनाने राहणाऱ्या सर्व समाजाला गुन्हेगार घोषित करून जंगल हडपायला सुरवात केली.  भारत स्वतंत्र होण्याआधी पर्यंत,  बंजारा समाज जोपर्यंत इंग्रज सरकारच्या कायद्याचा  गुन्हेगार होता. तोपर्यंत हा समाज जंगल जंगल भटकंती करत जगत होता. 

         बंजारा समाज आज पण सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर मागासलेलाच आहे. नुसते आंध्रप्रदेशच नाही तर महाराष्ट्रा बरोबरच जगात सुद्धा या समाजाने आपली पायमुळे पसरवली आहे. चीनच्या सत्तेखाली असलेला तिबेट असो कि, बांग्लादेश; सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात बंजारा समाजाची लोक पाहायला मिळतात. चीनच्या सत्तेखाली असलेल्या तिबेट मध्ये ४०% जनता हि बंजारा आहे. लोकांच्या समजुती, शिक्षणापासून दूर राहणे, व्यापार भटकंती आणि अलिप्त समाजाचा इतिहास, अंधश्रद्धा या सर्वच गोष्टीचा या समाजावर कमीजास्त परिणाम पडला आहे.

आज जग चंद्रावर आणि मंगळावर जाऊन वसाहती करण्याचा जेव्हा स्वप्न पुर्नतेत नेण्याचा प्रयत्न करतोय; तेव्हा हा समाज आजपण अंधश्रदेत खितपत व पूर्णपणे बुडाला आहे. आज या लोकांना वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते: जसे महाराष्ट्रा मध्ये गोरमाटी अथवा बंजारी, तेलंगना  व आंध्रप्रदेश मध्ये लम्बडा, कर्नाटक मध्ये लम्बाडी, पंजाब मध्ये बाजीगर, उत्तरप्रदेश मध्ये नायक आणि तिबेट मध्ये राणी.

या समाजाचा अथवा बंजारा लोकांचा इतिहास खूप गौरवशाली आहे या समाजाची पायमुळे थेट सिंधु संकृतीशी जोडलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इसवी सणाच्या आधीचा व भारतातील बुद्ध आणि जैन धर्माच्या स्थापनेच्या आधीचा हा समाज. पण इतिहासकारांनी यांची दखल कुठेच घेतली नाही, कारण हा समाज एकतर तांड्याने राहायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत भटकंती आणि त्यावेळच्या ब्राम्हण, जैन अथवा बुद्ध लेखकांना यांच्या विषयी लिहणे तेवढे महत्वाचे वाटले नसावे.

 या समाजाची स्थापना पीठागौर नावाच्या धर्मगुरू ने केली होती, हाच बंजारा समजाचा पहिला धर्मगुरू, पण आज कोणत्याच प्रकाराने या समाजाचा इतिहास संग्रहित नसल्याने आणि तो विखरलेला असल्याने या धर्मगुरू विषयीच्या माहितीपासून महाराष्ट्रामधील समाज खूप दूर आहे. यानंतर सुमारे ११व्या शताब्दी मध्ये या समाजाला दुसरा धर्मगुरु दागुरु या नावाने मिळाला. या धर्मगुरूचा इतिहासाने थोड्याफार प्रमाणात दखल घेतली आहे. चंद्रगुप्त मौर्य ज्या समाजातून आला तो समाज गायी राखायचा हे तर इतिहासाने पुराव्यासह दाखवले पण तो समाज बंजारा होता, हे दाखवायला कोणीच समोर कसे आले नाही याचे आश्चर्यच!. कारण इतिहासकारांनी आपल्या शोधात हे दाखवून दिले कि पिठागौर च्या काबिल्यातूनच चंद्रगुप्त मौर्य आणि हर्षवर्धन आले होते पण तो काबिला जो गाई राखायचा तो बंजाराचा होता हे मात्र कोणी लिहिलेले नाही.






      १६ व्या, १७ व्या शतकात बंजारा लोक जे समुद्राच्या किनाऱ्याला होती ते मिठाचा व्यापार करायचे तर काही जे समुद्र किनारयाला नव्हती ते धान्यमालाचा व्यापार करायचे आणि ते धान्य रसद म्हणून सेनेपर्यंत पोहचवण्याचे काम ते करत. उत्तरभारतातील राजपूत( राजपूत बंजारा) राजे, सोबतच दक्षिण भारतात जंगी आणि भूकीया( कर्नाटक, आंध्रप्रदेश) , मध्य भारताचे भगवान वडतिया हे त्या वेळेचे संपन्न धान्य व्यापारी असे इतिहासकारांनी दाखऊन दिले आहे. अलीकडच्या अध्ययनाने मात्र काही गोष्टीचा उलगडा लावला आहे. दागुरू या धर्मगुरूची इतिहासाने जेव्हा दखल घेतली तेव्हा मात्र काही महान राजे बंजारा समाजाचीच हे त्यांना मान्य करावे लागले; राजा आला उद्दल आणि राजा गोपीचंद यांना स्थान देऊन, इतिहासकार येथेच नाही थांबले, राजा महाराणा प्रताप, राणी रूपमती आणि सेनापती गौर बंजारा हे याच समाजाचे होते हे स्पष्ट करून दाखवले आहे. हळदी घाटाच्या युद्धानंतर जो समाज बिखरल्या गेला तो आधुनिक बंजारा समाज. १८५७च्या स्वतंत्र संग्रामात भाग घेतला तेव्हा सूड म्हणून याच समाजाला गुन्हेगार घोषित करून अत्याचार करण्यात आले हे तर पूर्ण इतिहास जाणतो आणि हि गोष्ट सुद्धा अलीकडचीच.

   बंजारा समाज या सर्व गोष्टी पासून आजही अलिप्त आहे, कारण पाहिजे तसा न झालेला शिक्षणाचा या समाजात प्रसार. हा समाज आज पण सेवालाल महाराज हेच आपले पहले धर्मगुरु या भ्रमात आहे. वास्तविक पाहता हे या समाजाचे तिसरे धर्मगुरू आहेत. सेवालाल महाराज यांचा जन्म आंध्रप्रदेश च्या अनंतपुर जिल्हात गुत्थी तालुक्यात गोलाल डोडा येथे १५ फेब्रुवारी १७३९ ला आई धर्मनि हिच्या पोटी झाला. वडील भीमा आणि आजोबा रामजी नाईक खूप मोठे व्यापारी असल्याचा उल्लेख इतिहासकारांनी केला आहे त्यांच्या कडे २ लाख गाई होत्या(५२ तांड्याच्या ) गोकुळचा वासुदेव जसा व्यापारी तसा हा भीमा सुद्धा एक व्यापारी होता. १ तांडयाचा प्रमुख तो नाईक आनि ५२ तांड्याचा प्रमुख तो नाईकडा. सेवालाल महाराजाकडे ५२ तांड्याचे प्रमुख पद होते. प्रत्येक तांड्यातून एक स्त्री आणि एक पुरुष धर्म प्रचारासाठी असायचा. आज जे ६४ योगिनी असा वाक्य प्रचार केला जातो तो बहुदा या समाजातूनच घेतलेला असावा, कारण ६४ धर्मप्रचारक स्त्रियांच्या समूहाला ६४ योगिनी असे त्या वेळी संबोधल जात असे. निजामाच्या इतिहासकारांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, जस कि, निजामाने भीमा नायकाच्या तांड्याशी एक करार केला होता; २ लाख रुपयाचा, ज्या अनुसार हा समाज निजामाला रसद पुरवणार होता. या वरून स्पष्ट होते कि, हा समाज त्या वेळी निजामाच्या चाकरीत होता, पण नंतर इंग्रजाच्या दबावाने या लोकांना निजामाने काढून टाकले तेव्हा या समाजाने निजामासोबत युद्ध केले आणि निजामाला हरविले. याचा उल्लेख आंध्रप्रदेश च्या इतिहाकारानी केला आहे. या युद्धात हा समाज जिंकला होता याचे चिन्ह म्हणजे आजपण ज्या जागी युद्ध झाले त्या जागेला बंजारा हिल्स म्हटले जाते जे आज हेद्राबाद मध्ये आहे.या ठिकाणी नंतर या समाजाची वस्ती होती. पण आज मात्र त्या जागी फक्त सिने अभिनेत्याची चार मजली घरेच पाहायाला मिळते.

युद्धानंतर सेवालाल महाराज यांच्या निजामाने सर्व अटी मान्य केल्या आणि ज्या भेटवस्तू व तलवारी दिल्या त्या आजपण पोहरादेवी जिल्हा वाशीम, येथील मंदिरात आहेत. निजामाने महाराजाला अटीच्या पूर्ततेसाठी दिल्हीला बादशाह गुलाम खान यांच्या कडे पाठवले होते, खानने त्या सर्व अटी अमान्य केल्या, म्हणून सेवालाल महाराज यांना युद्ध करावे लागले. महाराज्यांच्या ९०० लोकांनी खानच्या २५००० सैनिकांना हरवले याची मात्र कोणत्याच इतिहासकारांनी दखल घेतली नाही हे पण एक आश्चर्यच, पण इतिहास काही खुणा सोडून जातो हे नक्कीच; दिल्ही मध्ये या जेथे जिंकण्याच्या च्या खुशीत रायसिमा हिल्स बांधण्यात आली ती मात्र याचा पुरावाचं आहे , लाहोरच्या गौर बंजारा व्यापारी संघटनेने या विजया वर महाराजांचे स्वागत केले. हे मात्र इतिहासकारांनी नोंदवून ठेवले आहे. जयपूरच्या भूमिया लोकांनी केलेल्या लुटीचे परिणाम हा समाज त्या वेळी राजस्थान मध्ये भोगत होता.समाजाच्या हाकेला साथ म्हणून महाराज तिथे गेले आणि भूमीया नामक लोकांपासून समाजाची सुटका करवून दिली याचा पुरावा म्हणजे जयपुरचे सवाई मानसिंग दवाखान्यातील सेवालाल मंदिर, जे आज पण त्याच स्थितीत आहे.

     पण उतरत्या काळासोबत समाजाला कळ लागली आणि आधी जे खुलेआम अत्याचार व्हायचे आता त्याची जागा गामिनीकाव्याने घेतली. जिथे आज भारताचे सर्वात मोठे कंटेनर आहे; जवाहर लाल नेहरू पोर्ट त्या ठिकाणी १७ व्या शतकात सेवालाल पोर्ट होते. जिथे हे पोर्ट आहे ते गाव आजपण सेवा नावानेच आहे. शेजारचे धरमतर पोर्ट, हे धरमतर म्हणजे महारांजाचे व्यापारी मित्र. ज्या ठिकाणी विनोबा भावेंचा जन्म झाला ते गोगादे म्हणजे महाराजाचे व्यापारी केंद्र होते या ठिकाणी आज पण सेवालाल महाराजांचे मंदिर आहे, महाराजाचे पोर्तुगाल व्यापारी लोकांशी सबंध होते हे आज नमूद करण्यात आले आहे.

                     असा हा प्राचीन समाज आणि ऐतिहासिक पुरुष सेवालाल महाराज. महाराज चमत्कारी नाही तर एक यौद्धा आणि महानसमाज सुधारक पुरुष होते यावर इतिहासकारांनी उजेड टाकला आहे. आज हा समाज अंधश्रद्धा आणि कुप्रधेत ग्रासत पडला आहे. महाराजांनी अहिंसा आणि दागुरू महाराजांनी शिक्षणच सर्व मुळाचे कारण म्हटले असता, हा समाज त्यांना समजू शकला नाही हे नक्कीच. सेवालाल महाराजांनी पशुबळी ऐवजी तूप आणि शिरा हाच देवाचा नैवद म्हटले तरी हा समाज त्यांच्या शिकवणी पासून दूरच आहे, आज या महान समाज सुधारकाची शिकवण हा समाज विसरताना दिसतोय!.

        बंजारा समाज, ज्यांच्या इतिहासाची दखल कोणीच घेतलेली नाही. माणसांनी तर नाहीच नाही! पण काळ सुद्धा त्यांच्या विरतेवर मौन असावं. म्हणजे नेमकी भीती कोणाला होती; हे न उलगडणार कोडंच. १८५७ च्या उठावात सहभागी न झालेल्या नागपूरच्या बाकाबाई असो कि, साताराचे प्रतापसिंग ज्याची नावे इतिहासाच्या १८५७च्या पानावर कोरली गेली. पण १८५७ च्या उठावात सहभागी होऊन विरगतीला जाणाऱ्या महाराष्ट्राच्या गोविन्दवीर बंजारा आणि सहारनपुरच्या वीर गहराबंजारा ची नावे अल्पित कशी राहिली, राहिली तर ती का याचा आढावा कोणत्याच इतिहासकारांनी का घेतला नसावा हे पण गुपितच. बंजारा समाजाची पायमुळे किती खोल रुतली गेली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचा १८५७ च्या युद्धातील बंजारा समाजाचा सहभाग. महाराष्ट्राचे फक्त गोविंदवीर बंजाराच नाही तर उत्तरप्रदेश आणि भारताच्या अन्य ठिकानावरून सुद्धा बंजारा लोकांनी या युद्धात सहभाग घेतला होता, तेव्हा असंघटीत असलेल्या या समाजाची कोणी तेवढी दखल घेतली नाही कारण तेव्हा बंजारा म्हणजे नेमका कोणता समाज माहित नसावा किंवा एकतर इतिहासकारांना त्यांची दखल घेणेच योग्य वाटले नसेल.

दुसरीकडे हा समाज तेव्हा चोरी, डकौती करत नव्हता तर तो सैन्याला रसद पुरविणे व नंतर पशुपालनाच्या व्यवसायापर्यंत स्थिर झाला होता. मग प्रश्न हा पडतो कि बंजारा समाजावर गुन्हेगार म्हणून का ठपका मारला गेला. १८५७ च्या आसपास महाराष्ट्र आणि आजबाजूच्या राज्यात काही उठाव झाले होते मग ते कोळ विद्रोह, बस्तर विद्रोह, गौंड विद्रोह असो कि, संथाल १८५५ , बिरसा विद्रोह १८९५, ओडीसा चा विद्रोह यात बंजारा समाज कमी जास्त सहभागी होता हे भारत सरकारच्या गुन्हेगारी जमाती कायदा १८७२ मध्ये नमूद करण्यात आले आहे. या कायद्यात ठळक पणे नमूद आहे कि, भारतातील २७२( महाराष्ट्रातील १३) जातींना गुन्हेगार म्हणून ठरविले जात आहे. ब्रिटीश भारत सरकारने ज्या जातींना गुन्हेगार घोषित केले त्यात बंजारा जातीचा समावेश आहे.

                     महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यात सुद्धा बंजारा समजाच्या लोकांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला होता हे सहारनपूरच्या इतिहासकालीन पत्र व्यवहारातून समोर आले आहे. ब्रिटीश अधिकार्यांनी केल्येल्या पत्र व्यवहारात याचा पुरावा सापडतो. पण हा बंजारा समाज कोणत्या नावाने नेमका ओळखल्या जात असावा याचा काही पुरावा सापडत नाही. रुरकी, हरिद्वार आणि देहरादून या भागातील बंजारा समाजाने १८५७ च्या गौरवशाली उठावात भाग घेतला आणि ते अमर सुद्धा झाले. रुरकी तालुक्यातील फुटूवा गावातील बंजारांनी गामिनिकावाद्वारे इंग्रजाशी युद्ध करण्याची रणनीती बनविली होती, त्यांनी इंग्रजाच्या वाटेत दगड आणि वाळूचे मोठे मोठे अडथळे निर्माण केले होते. बंजारा समाजाने पहिला उठाव १७ जुलै १८५७ ला सरदार गहराबंजारा याच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेश मध्ये केला. तेव्हा त्यांच्या विरुद्ध लढणारा प्रशिध्द सेनापती ज्याने नाना साहेब पेशवा आणि बेगम हजरत महल शी लढा दिला होता तोच रोबर्टसन. रोबर्टसन जेव्हा बंजारा लोकांना हरवू शकला नाही तेव्हा त्याने त्यांची गावे जाळून टाकली आणि त्यांच्या गाई इंग्रज सैनिकांना वाटून टाकल्या. आणि फुटुवा च्या ११ वीर लोकांना फाशी देण्यात आली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्रप्रदेश या भागातील लोकांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला होता हे आज समोर येतेय. इतिहास दबल्या जाऊ शकतो पण, बदलल्या जाऊ शकत नाही याचंच हे उत्तम उदाहरण.

                   १८५७ च्या उठावा मध्ये बंजारा समाजाची महत्वपूर्ण भूमिका होती, हि बाब लक्षात आल्या नंतर ब्रिटीश भारत सरकारने बंजारा जातीचा बंदोबस्त करण्यासाठी व त्यांचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारी जमाती कायदा १८७२ केला. हा कायदा करण्यामागील मुख्य भूमिका म्हणजे; भारतात राज्य करीत असताना पुन्हा असा लोकांनी स्वतंत्र होण्यासाठी विद्रोह करू नाही असा होता. इंग्रजांनी हा कायदाच इतका सशक्त बनविला होता कि आज हा कायदा नसला तरी त्याचे परिणाम मात्र आजही हा समज भोगताना दिसतो. या कायद्यानुसार बंजारा समाजातील जन्माला येणारे मुल सुद्धा काही न करता गुन्हेगार ठरविल्या जात असे कारण गुन्हेगाराचा मुलगा गुन्हेगार असतो असा तो समज होता. एवढेच नाही तर मी सिद्ध करू शकतो कि मी गुन्हेगार नाही किंवा मुळात मी गुन्हेगारचं नाही हा सांगण्याचा अधिकार सुद्धा या कायद्याने काढून घेतला होता. मग न्यायालयात जाऊन" मुजे इन्साफ दो जज साहब" सांगायची काही गरजच उरत नाही. आज जे आपण गाई, बकऱ्या साठी खुल्या जागी ताराचे कुंपण करून कोंडवाडा तयार करतो. तसेच काहीसे करुण बंजारा समाजाच्या लोकांसाठी तरुंग निर्माण करण्यात आले होते, त्यात त्यांना पशु प्रमाणे कोंडल्या जात आणि मग सुधारनेच्या नावाखाली अत्याचार चालत; त्या अत्याचारातून महिला सुद्धा सुठत नसत हे वेगळे सांगायला नकोच.



                                अशा तरुंगातून ज्या लोकामध्ये काही सुधारण्या झाल्या त्यांना वसाहतीने राहायला परवानगी देत असत.पण तरी सुद्धा त्यांना दिवसातून ३ वेळस हजरी देणे सक्तीचे होते. मग हजरीच्या नावावर यांच्या कडून घरचे आणि इतर काही कामे करून घेतली जात. हजरीच्या धस्तीने बंजारा लोक एवढे भिलेले असायचे कि, कामावर जाने अथवा स्वताचे काम करणे ते टाळायचे. कारण जर हजरीला उशीर झाला अथवा गेलेच नाही तर अत्याचार, मांडीच्या खाली- पायाच्या मागून विठा ठेऊन त्यावर बसायला लावणे, लघुशंका इतर आयुष्यउपयोगी क्रिया न करू देणे, खाणे पिणे बंद; असे करायचे. त्यामुळे कधी स्व संपन्न असलेला हा समाज दारिद्राने ग्रासला गेला याचा पत्ताच कोणाला लागाला नाही. प्रश्न हा पडतो कि १८५७ ला ज्या लोकांनी भाग घेतला त्यांचे नाव अजराअमर झाले. जा जातींनी सहभाग घेतला त्यांची नावे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहली गेली. त्यांचा जयजयकार झाला. भिल्ल, कोळी,रामोशी यांचा इतिहास लिहला गेला; उरला तो बंजारा समाजच का?. महाराष्ट्रातील गोविंदवीर बंजारा खानदेश मधून लढला याचा अर्थ आणखी हि बंजारा लोक या उठावात सहभागी झाली होती असाच काडावा लागेल. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली असताना, बंजारासमाजात वीरपुरुष जन्माला आले असताना, हा सामाजाच कसा अलिप्त असावा! . आजही लोकांच्या या समाजाकडे पाहण्याच्या द्रुष्टीत जास्ती काही फरक झालेला दिसत नाही, आजही लोकांसाठी न बदलेला, अशिक्षित, रानटी, समाज म्हणजे बंजारा समाज अशीच समजूत आहे. त्याला कारण आजही असंघटीत आणि अंधश्रद्धेत ग्रस्त असलेला बंजारा समाज. या सगळ्याचे मूळ म्हणजे उपलब्ध नसलेला त्यांचा इतिहास. इतिहास का हवा असतो तर इतिहास हा नेहमीच गौरवशाली आणि स्फूर्तीदायक असतो. त्यातून तरुणपिढीला शिकायचे असते कि, आपल्या प्रगती साठी आपण काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्ठी सोडून, कोणत्या नवीन गोष्टी आत्मसात करायला पाहिजे. नेमका इतिहास म्हणजे झालेल्या चुका पुन्हा न करणे व ज्या मुळे आपल्याला गौरवप्राप्त झाला त्या गोष्ठी न त्यागने होय.

              १९४६ ला मुंबईच्या तलवार सैनिकी जहाजीवर झालेला उठाव सर्वाना माहित आहे, हा उठाव केला म्हणून सरदार पटेलांनी या जहाजीवर च्या आणि ज्यांनी या उठावात भाग घेतला होता, त्यांना कधीच सरकारी नौकरीत घेतले नाही आणि सवलती सुद्धा दिल्या नाही. सरदार पटेल यांच्या नंतर यात थोडे परिवर्तन झाले हि वेगळी गोष्ठ. असेच काहीसे झाले ते बंजारा जाती बरोबर इंग्रजांनी पुन्हा यांना नेमक्या प्रवाहातच येऊ दिले नाही, त्यांच्यावर तेवढे निर्बंध लादले गेले आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा तीच रननीती कमीजास्त प्रमाणात स्वीकारली गेली हे नक्कीच! ....

  

 - © मनवर सुनील   
      (मुक्तपत्रकार)                                   

Previous Post Next Post